आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगाच्या आर्थिक वृद्धीदरात कपात
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आज जगाचा आर्थिक विकासाचा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा राहील असा अंदाज वर्तवला. गेल्यावर्षी जगाचा आर्थिक विकास दर ६ टक्के होता. यंदा हा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्के आणि पुढच्यावर्षी २ पूर्णांक ७ दशांश राहीलस असा नाणेनिधीचा अंदाज आहे. जगभरातली अनपेक्षित घसरण, गेल्या काही दशकातला सर्वोच्च महागाई दर, वाढता खर्च, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनासारख्या गोष्टींमुळं हा दर घटल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे.
भारताच्या विकासदराच्या अंदाजात ६ दशांश टक्क्यांनी कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७ पूर्णांक ४ दशांश ऐवजी ६ पूर्णांक ८ दशांश असेल, असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी वृद्धी दर राहण्याची शक्यता असल्यानं ही कपात करण्यात आल्याचं नाणेनिधीनं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. पुढच्यावर्षी देशाचा विकास दर ६ पूर्णांक १ टक्के राहण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर साडे ६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवला होता.
