पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून ३ दिवसीय गुजरात दौर्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा गुजरात दौरा आजपासून सुरु होत आहे. गांधीनगर येथे शाळांसाठीच्या नियंत्रण केंद्राला ते भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवण्याच्या अनुषंगाने सुमारे पाचशे कोटी डाटा सेटस संकलित करून कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे त्यांचं विश्लेषण करण्याचं काम या केंद्राद्वारे केलं जातं. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी आणि शिक्षणाच्या पध्दतीत वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या बदलांबाबत माहिती देखील येथे ठेवली जाते.
पंतप्रधान उद्या बनास कांठामध्ये दिओदर इथं बनास डेअरी संकूलातील विविध विकास प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. जामनगर इथं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या पारंपरीक औषधी केंद्रांचा पायाभरणी समारंभही त्याच्या हस्ते होणार आहे. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेओसेस उपस्थित राहणार आहेत.
GCTM हे पारंपरीक औषधांसाठीचं पहिलं आणि जागतिक स्तरावरील एकमेव केंद्र आहे. तसंच कृषी आणि पशुपालन याविषयी शेतकऱ्यांना वैज्ञानिक माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेलं बनास कम्युनिटी रेडिओ केंद्र ते देशाला समर्पित करणार आहेत. यामुळे १ हजार ७०० गावांमधील ५ लाख शेतकरी या रेडिओ केंद्राशी जोडले जाणार आहेत. बुधवारी आयुष गुंतवणूक आणि संशोधन परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
