महाराष्ट्रभर आज गणेश विसर्जनाची लगबग, मानाच्या गणपतींचं प्रस्थान
मुंबई/पुणे: आज संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची लगबग सुरु झाली असून मोठं मोठ्या मंडळांच्या मिरवणुका सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाल्या आहेत. अनंत चतुर्थी निमित्त होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या भव्यते आणि मिरवणूकांसाठी मुंबई-पुणे ही शहरं प्रामुख्याने ओळखली जातात तसेच सांगली, कोल्हापूर व नाशिक येथील मिरवणुकांतही भाविकांच्या उत्साहाला पारावार नसतो.
मुंबईत लालबागमधील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात लालबागच्या राजासह इतर मोठया सार्वजनिक गणेश मंडळांच्याही मिरवणुकीला सुरुवात होत आहे. मुंबई पोलिसांतर्फे गिरगाव, दादर या चौपाट्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने ४५ जर्मन तराफे, ६३६ जीवरक्षक व ६५ मोटार बोटींची व्यवस्थाही केली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे.
पुण्यातही मानाच्या कसबा पेठेतल्या गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
