इथेनॉल पुरवठ्यासाठी साखर कारखान्यांचे तेल कंपन्यांसोबत ३१८ कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार करार
देशभरातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामात सुमारे ३१८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याबद्दलचे करार विविध तेल कंपन्यांशी केले आहेत. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा साखरेपेक्षा इथेनॉलच्या उत्पादनावर अधिक भर देण्यात आला मात्र कोरोना प्रादुर्भावामुळं देशाच्या विविध राज्यात टाळेबंदी लागली आणि पेट्रोलचा खप तुलनेत कमी झाला. त्यामुळं इंधनात मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलची मागणी कमी होऊन सुद्धा कारखान्यांनी सुमारे ३१८ कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केल्यानं समाधान व्यक्त होत आहे.
दुसऱ्या बाजूला इंधनातील इथेनॉलच्या २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यात अजूनही यश आलेलं नाही, देशभरातील केवळ ११ राज्यांनी इथेनॉल मिश्रणाचा मुद्दा गांभीर्यानं घेऊन त्यादिशेने वाटचाल सुरु केली असली तरी तिथंही इथेनॉल मिश्रणाच प्रमाण ११ ते १३ टक्य्यांच्या वर गेलेलं नाही. अन्य काही राज्यात तर हे प्रमाण अजूनही ४ ते ६ टक्केच आहे.
त्यामुळे याप्रकरणी धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावर सुलभ पद्धतीनं चालतील अशा प्रकारच्या वाहन निर्मितीलाही चालना देण्याची गरज असून आगामी ३ वर्षात त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन वाहन निर्मिती उद्योगातून देण्यात आलं आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने इथेनॉल आणि साखर उद्योगालाही चांगले दिवस येतील असा विश्वास या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
