मनी लाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ ने त्यांना हजर राहण्यासाठी दोनदा समन्स पाठवले होते
मुंबई, दि. १ : मुंबईतील विशेष न्यायालयाने मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख याला जामीन मंजूर केला. सलील समक्ष हजर झाल्यानंतर न्यायालयाने हा दिलासा दिला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या खटल्यांच्या सुनावणीसाठी फेब्रुवारीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची तक्रार (आरोपपत्र) सादर केल्यानंतर सलील देशमुख यांना समन्स बजावले होते. सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र असून त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर सलील यांनी वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला, तो मान्य करण्यात आला.
सलील देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला आहे. अर्जानुसार, सलीलला या प्रकरणात ईडीने कधीही अटक केलेली नाही आणि ते तपासात सहकार्य करत आहेत. ईडीने सलील यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी ने त्यांना दोनदा समन्स पाठवले होते पण ते हजर झाले नाहीत, एजन्सीने असेही म्हटले की न्यायालयाने स लीलला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते पण ते आता हजर होत आहेत. “त्यांना एजन्सीबद्दल आदर नाही किंवा न्यायालयाचा आदर नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा” असे ईडीने आपल्या युक्तिवादात म्हटले. परंतू, अखेर विशेष न्यायालयाने सलील देशमुख यांना जामीन मंजूर केला.
