चौकशीच्या ९ तासांनी अखेर संजय राऊत ईडी च्या ताब्यात
मुंबई, दि. ३१ : आज सकाळी ७ वाजता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. जवळपास नऊ तास चाललेल्या चौकशी नंतर अखेर राऊत यांना ईडी पुढील चौकशीसाठी मुंबई येथील कार्यालयात घेऊन गेली. त्याचवेळी या कारवाईपूर्वी संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेना नेते म्हणाले, बंडखोर आमदारांनी केंद्रीय तपास यंत्रणांपासून बचाव करण्यासाठी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केल्याचे प्रामाणिकपणे मान्य करावे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोक’ या साप्ताहिक लेखात संजय राऊत म्हणाले, ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून बंडखोर गटाने बाजू बदलली असे म्हणणे थांबवावे. हिंदू धर्माची विनाकारण बदनामी का करत आहात? प्रामाणिकपणा दाखवा की प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी ईडीपासून पळून गेला.
शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी आपल्यावर दबाव असल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले आहे आणि त्यामुळेच आपण बंडखोर गटात सामील झाल्याचा दावा केला. राऊत म्हणाले की, ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांचा जवळचा सहकारी रईस खानला अटक केली, परंतु गवळी यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केल्यावर खानची सुटका करण्यात आली आणि गवळी यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवरील स्थगिती उठवण्यात आली.
‘मरेन पण शरण जाणार नाही’
सकाळी ईडीने धाड टाकल्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी ट्विट केले की, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” पुढे दुसर्या ट्वीट महद्ये ते म्हणतात, “खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र!”
