आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांचा घेतलेला हा मागोवा वाचा
मुंबई, दि. २३ : पोलीस आणि गुन्हेगार यांच्या सुप्त संबंधांविषयी विशेष सांगण्याची गरज नाही. कधी हे संबंध शत्रुत्वाचे असतात तर कधी मित्रत्वाचे. असे संबंध शत्रुत्वाचे असतील तर ते सामान्य जनतेच्या हिताचेच आहे परंतू हेच संबंध जर मित्रत्वाचे झाले तर मग ही चिंतेची बाबच म्हणावी. मनसुख हिरेन प्रकरणानंतर मुंबई पोलीस दल सर्वार्थाने ढवळून निघालं आहे.
मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांबाबत नव्याने उजळणी सुरू झाली आहे. यात मुख्यत्वे नाव घेतलं जातंय ते देवेन भारती यांचं. १९९५ च्या बॅच चे आयपीएस अधिकारी असलेल्या देवेन भारती यांची, अनेक खुनांच्या गुन्ह्यांत सध्या तळोजा जेल मध्ये शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर विजय पालांडे याने ‘सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन’ कडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई क्राईम ब्रांच ने त्याला मुख्यालयात पाचारण करत या प्रकरणी जबाब नोंदवला होता. विजय पालांडे याने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की देवेन भारती यांचे अनेक गँगस्टर्स शी जवळचे संबंध आहेत तसेच त्याने भारतींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही लगावले होते. त्यांची अनेक ठिकाणी बेनामी संपत्तीही असल्याचेही पालांडे चे म्हणणे होते.
महत्वाचं म्हणजे गँगस्टर्स विजय पालांडे याचं म्हणणं होतं की त्याने अनेक उद्योजकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती भारती यांच्याकडे सोपविली होती व हीच माहिती त्यांनी पुढे अंडरवर्ल्ड ला सुपूर्द केली. ज्यानंतर या उद्योजकांना खंडणीसाठी फोन जायचे. धमकीच्या कॉल नंतर जर तो व्यवसायिक देवेन भारती यांच्याकडे गेला की भारती त्याला ठराविक रक्कम देण्यास सांगून ते प्रकरण सेटल करत असत. या शिवाय मुंबईतील मटका व्यावसायिकाला देवेन भारती यांचा पाठिंबा होता असाही एक आरोप पालांडे ने केला होता. गुन्हेगारी जगतातील छोटा शकील, संतोष शेट्टी, एजाज लकडावाला अशा एक ना अनेक गँगस्टर्स शी भारतींचे घनिष्ठ संबंध होते असेही त्याने आपल्या तक्रारपत्रात नमूद केले होते.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेन भारती यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती केली होती. पांडे यांनी अभ्यासपूर्ण असा सविस्तर अहवाल गृहमंत्री देशमुख यांच्याकडे सादर केला होता. दरम्यान तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहीत देवेन भारती यांच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांकडे लक्ष वेधले होते.
परंतू यानंतर कोविड चे संकट राज्यासह देशावर आले व इतर प्रकरणांसह याकडेही दुर्लक्ष झाले. २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात भारती यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदावरून बदली करत त्यांना साईड पोस्टिंग ला टाकण्यात आले परंतू त्यांच्यावर कारवाई काही झाली नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेन भारती जवळपास ४ वर्ष मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) हे पद सांभाळत होते. एप्रिल २०१५ साली या पदावर नियुक्ती झाल्यावर तीन वर्षांनंतर त्यांची बदली होणे अपेक्षित होते. परंतू तसे झाले नाही जी बाब पोलीस दलात त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
अखेर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने तत्कालीन फडणवीस सरकारला त्यांची बदली करण्यास सांगितले होते. तत्पूर्वी राज्य सरकारने भारती यांना, आहे त्याच पदावर व ठिकाणी काम करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे एक प्रस्ताव दिला होता परंतू तो फेटाळण्यात आला. या सर्व घटनाक्रमांतून एकच बाब स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे कायदा हा फक्त सामान्यांसाठी असतो व त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना तो अनेकदा आपल्या सोयीनुसार वाकवता येतो.
खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
