‘तौक्ते’ चक्रीवादळ आता मुंबईजवळ; गुजरात च्या दिशेने मार्गक्रमण
मुंबई, दि.१७: अरबी समुद्रात घोंगावणारं ‘तौक्ते’ चक्रीवादळ आज सकाळी सहा वाजता अलिबागच्या किनाऱ्यालगत होतं. किनाऱ्यापासून शे दिडशे किलोमीटरचं अंतर कायम राखत उत्तरेकडे वाटचाल करणाऱ्या या वादळाची पुढे सरकण्याची गती वाढली आहे. ते आता ताशी १८ किलोमीटरच्या गतीनं पुढे सरकत असल्यानं याक्षणी मुंबई लगतच्या समुद्रात असण्याची शक्यता आहे.
वादळाची तीव्रता आणखी वाढली असून आता त्याचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग ताशी १५० ते १६० किलोमीटर आहे. गती वाढल्यामुळे तौक्ते वादळ आता १८ तारखेला पहाटेच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे सध्या मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू असून पालघर मध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढू लागला आहे.
