मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले : उद्धव ठाकरे
मुंबई: काल झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या भाषणात राम मंदिराबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, “रामजन्मभूमी व प्रभू रामाचे मंदिर व्हावे ही शिवसेनेची मागणी आहे. रामाचे मंदिर हे मत मागायला नको आहे, ही संपूर्ण देशाची आणि हिंदूंची मागणी आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, “मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले. अजित पवार तुमच्या डोळ्यात पाणी आहे पण धारणात पाणी नसणार तेव्हा काय करणार? तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे.” काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे राजीनामा नाट्य रंगले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य करणे टाळले.
