
विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला
मुंबई, दि. १०: काल राज्याचे बजेट जाहीर झाले. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असल्याच्या घोषणा देत डोक्यावर भोपळे घेऊन विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
“बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा.. बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके…” अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. यावेळी आ. आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्वांना आश्वासने देऊनही त्यातील किती पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. “आज जे आश्वासन देत आहेत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवता येईल?”