भिडे वाड्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पुणे/नवी दिल्ली, दि.3: सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाड्यासंदर्भातील याचिका आज फेटाळली. भिडे वाडयाचा ताबा पुणे महापालिकेला देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला होता. या निकालाविरोधात भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान; तेरा वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी यक्त केली. याचिकाकर्त्यांना दंड का करू नये असा प्रश्न देखील न्यायालयाने केला आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाड्यामध्ये सुरू केली. भिडे वाडयामध्ये राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम २००६ पासून रखडलं आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बॅकेच्या २४ भाडेकरूंनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Source – AIR