अभिनेता आयुषमान खुराना आणि विकी कौशल यांना मिळाला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली: ‘अंधाधून’ चित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महानटी’ या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -2018’ चे वितरण करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्रालयाचे सचिव रवि मित्तल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीचे निवडक परिक्षक यावेळी मंचावर उपस्थित होते.
‘भोंगा’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा मंदार- नलिनी प्रोडक्शनचे शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि १ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
