Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गोवारीकरांच्या “पानिपत” चा ट्रेलर प्रदर्शित, मराठमोळा कश्यप परुळेकर रघुनाथराव पेशव्यांच्या तर गश्मिर महाजनी जनकोजी शिंदेंच्या भूमिकेत

गोवारीकरांच्या “पानिपत” चा ट्रेलर प्रदर्शित, मराठमोळा कश्यप परुळेकर रघुनाथराव पेशव्यांच्या तर गश्मिर महाजनी जनकोजी शिंदेंच्या भूमिकेत

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित “पानिपत” चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. उत्कंठावर्धक अशा या ट्रेलर मध्ये अर्जुन कपूर ने साकारलेला सदाशिवरावभाऊ आणि संजय दत्त ने साकारलेल्या अहमदशाह अब्दाली या दोहोंमधले द्वंद्व पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. याच सोबत क्रीती सेनॉन ने साकारलेली पार्वतीबाईही अस्सल मराठमोळी दिसते. तसेच मोहनिश बेहल यांनी साकारलेल्या नानासाहेब पेशव्यांचा रुबाबदार लुक ट्रेलरमध्ये उठावदार दिसतोय.

या चित्रपटात हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बुजुर्ग अभिनेत्री झीनत अमान यांनी सकिना बेगम ची तर पद्मिनी कोल्हापुरे आणि सुहासिनी मुळे यांनी अनुक्रमे गोपिकाबाई आणि राधाबाई या पेशवा घराण्यातील स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत. याच सोबत चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतले मोठे चेहरेही महत्वाच्या भूमिकेत आहेत. यात अटकेपार मराठ्यांचा झेंडा रोवलेल्या रघुनाथराव पेशव्यांची भूमिका साकारली आहे अभिनेता कश्यप परुळेकर याने. रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित “तप्तपदी” या चित्रपटानंतर आता पानिपत मधून त्याने थेट बॉलीवूड मध्ये प्रवेश केला आहे.

याच सोबत मराठीतल्या डॅशिंग ऍक्टर्स पैकी एक असलेला गश्मिर महाजनी जनकोजी शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एक योगायोग असा की याच चित्रपटात गश्मिर चे बाबा म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ नट रवींद्र महाजनी यांनी मल्हारराव होळकरांची भूमिका साकारली आहे. मराठ्यांचा धगधगता अंगार म्हणून ज्या सरदाराचं नाव घेतलं जातं त्या दत्ताजी शिंदे यांची भूमिका अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी साकारली आहे. तसेच कृतिका देव या मराठमोळ्या अभिनेत्रीने विश्वासराव पेशव्याच्या पत्नीची म्हणजे राधिकाबाईची भूमिका साकारली आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी पानिपत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *