दिवंगत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांचा सरकारला इशारा
मुंबई दि. ११: मराठमोळे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक यांनी दोन वर्षांपूर्वी रिपब्लिक टीव्ही चे अर्णब गोस्वामी यांच्याकडून केलेल्या कामाचे पैसे न आल्याने अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व गृह विभागाने गोस्वामींवर कठोर कारवाई करावी म्हणून त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करत आपल्या व्यथा पुन्हा सरकार व जनतेसमोर मांडल्या.
यावेळी त्यांनी सांगितले की गृहखात्याकडून सुरू झालेल्या सीआयडी चौकशी बाबत अद्याव आम्हाला काहीच कळले नाही. ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे आमच्या सोबत असून त्यांच्या पुढाकाराने २ पत्र आम्ही शासनाला दिली असून त्याबाबतही अद्याप काहीच उत्तर मिळालेले नाही.”
पुढे त्या म्हणाल्या की अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येबाबत माध्यमांत, वृत्तपत्रांत बरीच चर्चा होतेय. महाराष्ट्रातील व देशातील बांधवांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला प्रश्न विचारावा असे त्या म्हणाल्या. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर १५ ऑगस्ट रोजी आम्ही मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह करू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी शेवटी दिला.
सध्या देशभर सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले असून भाजपकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत असून रिपब्लिक टीव्ही चे अर्णब गोस्वामी यांनी तर एकेरी उल्लेख करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या कार्यक्रमात टीका केली होती.
