राज ठाकरेंच्या सभांमुळे आघाडीला चांगलाच फायदा होईल : अजित पवार
बारामती: २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत असलेल्या सभांचा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल का, अशी चर्चा सर्वत्र रंगली असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावर उत्तर दिले आहे.
यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांमुळे आघाडीला चांगला फायदा होईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मोदींच्या सभेला गर्दी जमवावी लागते, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरेंच्या सभांचा आघाडीला फायदा होईल का, असा प्रश्नही त्यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यावर ते म्हणाले, राज ठाकरेंच्या सभांमुळे चांगला प्रभाव पडतोय. पूर्वी मोदींच्या सभेला गर्दी व्हायची, पण लोकांचा आता मोदींवर विश्वास नाही. त्यामुळे वर्धा येथील सभेला गर्दीच झाली नव्हती. आता काही लोकांना गर्दी जमवावी लागते. गाड्यांची सोय करावी लागते. पण आमच्या इथे तसं करावं लागत नाही, असे सांगत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
त्याचप्रमाणे बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण भाजपला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी असं आव्हान अजित पवरांनी दिलं आहे. बारामतीचा गड राष्ट्रवादीच राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अजित पवार यांनी मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांची कन्या आणि सध्याच्या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या समोर भाजपाच्या कांचन कुल यांचे आव्हान आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघात रंगतदार लढत होणार असल्याने साऱ्यांचे लक्ष या लढतीकडे लागून आहे.
