राज्यातील २८५ प्रजातींच्या फुलपाखरांना मिळणार मराठी नावे
राज्यातील २८५ फुलपाखरांना मराठीत नावं देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने संभाव्य यादी नुकतीच जाहीर केली. राज्यात २८५ प्रजातींच्या फुलपाखरांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र या फुलपाखरांची शास्त्रीय नावे लॅटिनमध्ये आणि सामान्य नावे इंग्रजीत आहेत. सामान्य नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, अंगावरील ठिपके, वागणूक, त्यांचा एखाद्या परिसरातील वावर, त्यांचा शोधकर्ता या आधारे दिली आहेत. मात्र ही नावे मराठीमध्ये उपलब्ध झाल्यास ती लक्षात ठेवण्यामध्ये अधिक सोपेपणा येईल यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीतून नावे असावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अभ्यासक, निसर्गप्रेमी आदींना विविध माध्यमांद्वारे नावे पाठवून त्यावर सर्वांची मते, सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.