एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड यांनी पुण्यातील दुरुस्ती डेपोला दिली भेट
पुणे, दि. ६: एअर मार्शल तसेच भारतीय वायू दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड विजय कुमार गर्ग आणि वायू दल कुटुंब कल्याण संघटनेच्या (प्रादेशिक) अध्यक्ष रितू गर्ग यांनी ४ ते ६ जुलै २०२४ या कालावधीत पुणे येथील वायू दलाच्या तळावरील दुरुस्ती डेपोला भेट दिली. एअर कमोडोर, एअर ऑफिसर कमांडिंग, ए. पी. सराफ आणि वायू दल कुटुंब कल्याण संघटनेच्या (स्थानिक) अध्यक्ष प्रणोती सराफ यांनी त्यांचे स्वागत केले.
विविध प्रकारचा वारसा जतन करण्यात तसेच अद्ययावत तांत्रिक मदत आणि एव्हीओनिक्स प्रणाली प्रदान करण्यात या दुरुस्ती डेपोने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल एअर मार्शल गर्ग यांना माहिती देण्यात आली. डेपोद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध दुरुस्ती, आवश्यक दुरुस्तीसाठी पूर्व तपासणी आणि स्वदेशीकरण २०२४ प्रकल्पांबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. या प्रयत्नांचे कौतुक करताना, एअर मार्शल गर्ग यांनी डेपोमधील विविध प्रक्रियांचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक पद्धतींचा अवलंब करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. स्वावलंबन साधण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल तसेच भारतीय हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी डेपोच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
वायू दल कुटुंब कल्याण संघटनेच्या (प्रादेशिक) अध्यक्ष रितू गर्ग यांनी स्टेशन मेडिकेअर सेंटरमधील दिव्यांग मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या उपचार केंद्राला भेट दिली. वायू दल कुटुंब कल्याण संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन रितू गर्ग यांनी संगिनींशी संवाद साधताना केले.