शिवसेनेच्या २३ खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला जाणार – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. शिवसेनेच्या २३ विजयी खासदारांना घेऊन आम्ही काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला जाऊच, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. प्रताप फाउंडेशनच्या वतीने शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या रक्ताचा, शरीराचा जो भगवा रंग आहे, तो कधीच उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नाही, तर सोबत उभे आहोत. माझ्यासाठी कुणी उत्तर हिंदुस्थानी, कुणी दक्षिण हिंदुस्थानी, कुणी पूर्व हिंदुस्थानी असे नाही तर माझ्यासाठी सर्व हिंदू आणि हिंदुत्ववादी आहेत. मी माझे भाषण मराठीत करत आहे. ते मी हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि अन्य भाषेत केले असते, मात्र मी येथे भाषण नाही तर ‘दिल की बात’ करण्यासाठी आलो आहे. तुमच्यापैकी अनेक जण माझ्या जन्मापूर्वीपासून येथे राहत आहेत. माझ्यापेक्षा चांगले मराठी बोलत आहेत, मग त्यांना मी वेगळे कसे समजू! आज होळीच्या सणानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, युवासेना सचिक पूर्वेश सरनाईक, शंकर वीरकर, धनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
