“सर्व स्थायी व कंत्राटी कामगारांची कोरोना तपासणी करा” नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनची न.मु. पालिका प्रशासनाकडे मागणी
नवी मुंबई: देशभरात व राज्यातही कोरोनाच्या रुग्णांत दिसगणिक वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईही कोरोना रुग्णांचा आकडा मंद गतीने का असेना पण वाढतोय. यामुळे लॉकडाऊन ही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी ज्यात पाणीपुरवठा, मलःनिस्सारण, साफसफाई, आरोग्यसेवा, वाहतूक आदी सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पालिका प्रशासनाला एक आवाहन केले आहे. ज्यात प्रामुख्याने या कामगारांच्या कोरोना (कोविड-१९) तपासणीचा व त्यांच्या वाहतुकीसंदर्भातला विषय नमूद केला आहे. पाहुयात नेमकं काय आवाहन करण्यात आलं आहे ते.
आवाहन
१) मा. आयुक्त
नवी मुंबई महानगर पालिका
२) मा. कार्यकारी अभियंता
नवी मुंबई महानगरपालिका
(सर्व विभाग)
३) मा. एन. एम. एम. टी. प्रशासन
नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन तर्फे आवाहन वजा विनंती करण्यात येते आहे की, सध्या कोरोना वायरस च्या महामारी पासुन सर्वांची सुटका करण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन घोषित झाला आहे. परंतु ह्या काळात पाणीपुरवठा, मलनि:सारण, मलेरिया, साफसफाई, आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, बसचालक, वाहक, इ. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कंत्राटीकामगार मात्र आपल्या जिवाची त्यांच्या कुटुंबियांची काळजी न करता आपले कार्य चोख बजावत असतांना त्यांची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु असे होताना कुठेतरी प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे कामगारांचे मनोधैर्य कमी होतेय. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे काही मागण्या करीत आहोत. कृपया त्याकडे गांभीर्याने पहावे ही विनंती.
१) सर्व प्रथम सध्या कार्यरत सर्वच कंत्राटी कामगारांची प्राथमिक कोरोना टेस्ट पुर्ण मोफत तत्काळ करण्यात यावी.
२) सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जे कामगार आॅनड्युटी आहेत त्यांना पगारा व्यतिरीक्त प्रोत्साहन भत्ता म्हणुन प्रतिदिन २०० ते ५०० रु मासिक पगारातच देण्यात यावा.
३) रेशनकार्ड असलेल्या सर्व कामगारांना (सफेद असले तरी) अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा.
४) कामगारांना अजुनही ड्युटीवर येण्यासाठी वाहनांची व्यवस्था पुरेशी नाहीए. तरी एन. एम. एम. टी. च्या बस फेऱ्या वाढवाव्यात (3 शिफ्टसाठी) आणि एका सिटवर एकच कामगार बसतील याची दक्षता घ्यावी. (सुरक्षित अंतर)
५) लाॅकडाऊन कालावधीनंतरही संकट कमी झाले नाही तर पाणीपुरवठा, मल:निसारण विभागातील कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याची व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी. (कुटुंबियांना त्रास नको म्हणून)
– नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन
