केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत देणार राजीनामा; म्हणाले “शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक”
मुंबई: शिवसेना भाजप मधल्या सत्ता संघर्षाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. काल भाजपने सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यावर राज्यपालांनी शिवसेनेला यासाठी निमंत्रण दिले. पण केंद्रात युतीत असलेली शिवसेना युती तोडणार का? हा प्रश्न साऱ्यांना पडला असताना आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी ट्विट करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे कळवले आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, “लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.” पुढे ते म्हणाले की, “शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?
आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे.”
थोड्याच वेळात त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल.
