मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांचे हुतात्म्यांना अभिवादन; मुंबई पोलीस आयुक्तांच्या कृतीवरून मराठी अभ्यास केंद्राच्या डॉ. दीपक पवारांची बोचरी टीका
मुंबई, दि. २१ : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या एका कृतीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करताना त्यांनी पादत्राणे न काढल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठी अभ्यास केंद्राचे मुख्य समन्वयक डॉ. दीपक पवार यांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ पोलीस आयुक्तांच्या कृतीवरच नव्हे, तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राज्यातील राजकीय नेत्यांवरही त्यांनी उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे.
हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पादत्राणे न काढताच अभिवादन केल्याचा मुद्दा डॉ. पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला. विशेष म्हणजे आजच भारती यांना पोलिस महासंचालक पदाचा दर्ज मिळाला आहे.
डॉ. दीपक पवारांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
देवेन भारती यांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करताना डॉ. दीपक पवार यांनी राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले. त्यांच्या फेसबुक पोस्टमधील मजकूर असा :
“मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना बूट काढण्याचा कंटाळा का केला असेल? ते परप्रांतीय आहेत म्हणून ते असं वागले असं म्हटलं तर त्यांचा मालक असलेल्या रेशीमबागेच्या विनाशपुरूषाच्या भावना दुखावतील का?
बाकी गुवाहाटीचा दलाल आणि अलिबागचा जमीनचोर तिथे काय करतोय?
नीलमताईंची पापं फुलं वाहून माफ होतील का?
लोढाशेठ हा भूखंड अद्याप आपल्या ताब्यात कसा आला नाही याचा विचार करत असेल का?
अभिवादन करून फडणवीस निघून गेले.
दोन मिनिटं राज्यगीत म्हटलं असतं तर झिजले असते का?”
— डॉ. दीपक पवार
या पोस्टमधून डॉ. पवार यांनी देवेन भारती यांच्या कृतीवर आक्षेप घेतानाच रेशीमबाग, गुवाहाटी, अलिबाग आणि भूखंडाच्या मुद्द्यांचा संदर्भ देत सत्ताधारी राजकीय नेत्यांवरही टीका केली आहे. तसेच हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर राज्यगीत म्हणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणकोणते मान्यवर होते उपस्थित?
हुतात्मा स्मृतिस्थळी झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होते.
याशिवाय कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनीही हुतात्मा स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
हुतात्मा स्मृतिदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी झालेल्या अभिवादन कार्यक्रमातील शिष्टाचाराचा मुद्दा डॉ. दीपक पवार यांनी उपस्थित केल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये केवळ देवेन भारती यांच्या पादत्राणांबाबतच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, तर इतर उपस्थित राजकीय नेत्यांच्या भूमिकांवरही उपरोधिक भाष्य करण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. दीपक पवार यांच्या या टीकेवर संबंधित मान्यवरांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे हुतात्मा स्मृतिस्थळी झालेल्या अभिवादनापेक्षा त्यानंतर उपस्थित झालेला शिष्टाचार आणि राजकीय टीकेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.


