मुंबईतील लोकभवनात जिष्णु देव वर्मा यांच्याशी संवाद; भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मुखोद्गत म्हणून दाखवला
मुंबई, दि. १३ : आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहण्याचा अनुभव आणि राज्यपालांशी थेट संवाद साधण्याची संधी… गोंदिया जिल्ह्यातील मांग गारुडी समाजातील ३० मुलामुलींसाठी मुंबईतील हा दौरा अविस्मरणीय ठरला. कुडवा येथील पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी मुलांनी आपल्या मुंबई भेटीतील अनुभव सांगितले, तर राज्यपालांनी त्यांच्या शिक्षणाचे आणि पाठांतराचे कौतुक केले.
रोजगाराच्या शोधात पालकांना वारंवार स्थलांतर करावे लागत असल्याने भटक्या-विमुक्त जमातीतील अनेक मुलांचे शिक्षण खंडित होते. ही अडचण लक्षात घेऊन भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र आणि भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या माध्यमातून विदर्भातील विविध भागांत पालावरच्या शाळा चालवल्या जातात. या उपक्रमांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईत नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर आणि विधान भवन पाहिल्यानंतर समुद्राने मुलांचे विशेष लक्ष वेधून घेतले. “मुंबईत आपण नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर, विधान भवन पाहिले परंतु आज येथून पाहिलेला समुद्रच सर्वांना खूप आवडला,” अशी प्रतिक्रिया मुलांनी राज्यपालांशी बोलताना व्यक्त केली.
भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मुखोद्गत
या भेटीत विद्यार्थ्यांनी राज्यपालांसमोर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठ करून दाखवला. तीसही मुलामुलींचे पाठांतर आणि शुद्ध उच्चार ऐकून राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. भटके-विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी परिषद करत असलेले काम महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिक्षणाबरोबरच मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. नियमित अभ्यास करून स्वतःचे भविष्य घडवावे आणि चांगले शिक्षण घ्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आगामी सुट्टीत या मुलांना पुणे दर्शन घडवण्याबाबत प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली.
स्थलांतरामुळे शिक्षणात खंड; पालावरच्या शाळेचा आधार
संस्थेचे शिक्षा आयाम प्रमुख प्रशांत सुरेश बोरसे यांनी राज्यपालांना या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. मांग गारुडी समाजातील पालक रोजगारासाठी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, पंजाब आणि काश्मीरपर्यंत स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण मध्येच थांबते. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी पालावरच्या शाळा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना अभ्यास आणि शिस्तीबरोबरच सामाजिक जाणीवांचे संस्कार दिले जातात. खर्रा खाणे आणि जुगारासाठी पत्ते खेळणे टाळावे, तसेच जबाबदार नागरिक बनावे, अशी शपथ त्यांना दिली जाते. भगवद्गीतेतील अध्यायांचे पठणही शिकवले जाते, अशी माहिती प्रशांत बोरसे आणि उर्मिला बोरसे यांनी दिली.
मुलांनी दररोज खेळासाठी वेळ द्यावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी, यावरही संस्थेकडून भर दिला जातो. स्थलांतरामुळे शिक्षणापासून दूर जाण्याचा धोका असलेल्या मुलांना शिक्षण, शिस्त आणि संस्कारांची जोड देण्याचा प्रयत्न या शाळांमधून केला जात आहे. मुंबई भेटीमुळे या विद्यार्थ्यांना नव्या ठिकाणांचा परिचय आणि राज्याच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला.

