दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा दणका
नवी दिल्ली, दि. ३० : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या निकालांचा जाहिरातींसाठी दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने वापर केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कठोर कारवाई करत नामांकित खाजगी शिकवणी वजीराम आणि रवी आयएएस स्टडी सेंटर एलएलपी ला ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील जाहिरातींच्या पारदर्शकतेबाबत महत्त्वाचा संदेश गेला आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या अंतिम आदेशानुसार, संबंधित संस्थेने नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या यशाचा प्रचारासाठी वापर करताना त्यांनी नेमका कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला होता, याबाबतची महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती. तसेच उमेदवारांची नावे, छायाचित्रे आणि यशाचा आधार घेत पूर्णकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत चुकीचा आभास निर्माण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील प्राधिकरणाने या प्रकरणाची सुनावणी करून संबंधित संस्थेविरोधात अंतिम आदेश दिला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालणे, शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता वाढविणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
तपासादरम्यान असे आढळून आले की, जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या अनेक उमेदवारांनी संस्थेच्या पूर्णकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाऐवजी केवळ मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला होता. हा कार्यक्रम नागरी सेवा परीक्षेच्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षांमध्ये यश मिळाल्यानंतरच सुरू होतो. त्यामुळे उमेदवारांच्या यशामागे संस्थेचे सर्वांगीण शैक्षणिक योगदान असल्याचा दावा वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे प्राधिकरणाने नमूद केले.
नागरी सेवा परीक्षेतील प्राथमिक आणि मुख्य हे दोन्ही टप्पे अत्यंत स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक मानले जातात. या दोन्ही टप्प्यांमध्ये संबंधित संस्थेचे कोणतेही थेट शैक्षणिक योगदान नसताना, उमेदवारांच्या अंतिम यशाचा वापर करून पूर्ण शुल्क आकारल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची जाहिरात करण्यात आली. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चुकीची धारणा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्राधिकरणाने निरीक्षण नोंदवले.
शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे यशाचे दावे आणि अनुचित व्यापारी पद्धती यांविरोधात देशभरातील विविध खाजगी शिकवणी संस्थांना आतापर्यंत ६० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
प्राधिकरणाने नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, वैद्यकीय प्रवेश परीक्षा, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. उपलब्ध माहितीनुसार, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये विविध संस्थांना आतापर्यंत एकूण १ कोटी ४६ लाख रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही संस्था खोटी, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू शकत नाही. जाहिरातींमध्ये यशस्वी उमेदवारांनी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेतले, त्याचा कालावधी किती होता आणि संस्थेचे प्रत्यक्ष योगदान काय होते, याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि ग्राहक संरक्षण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, भविष्यात अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात आणखी कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.
