विलंब करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) यांच्या आदेशांनुसार प्रलंबित असलेल्या वसुली प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. वसुली प्रक्रियेचा सखोल आढावा घेऊन शिल्लक रक्कम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, तसेच आदेशांची अंमलबजावणी टाळणाऱ्या आणि प्रक्रियेत विलंब करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपविलेल्या जबाबदारीनुसार प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महारेरा आदेशांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, प्रलंबित वसुली प्रकरणे आणि जिल्हानिहाय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या या बैठकीस आमदार अतुल भातखळकर, कोकण विभागाचे उपायुक्त, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर येथील निवासी जिल्हाधिकारी उपस्थित होते. संबंधित जिल्ह्यांमधील प्रलंबित प्रकरणांची माहिती सादर करण्यात आली. आदेशांची अंमलबजावणी अधिक गतीने व्हावी यासाठी महसूल व प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीदरम्यान विधानसभा तारांकित प्रश्नानंतर झालेल्या वसुलीचा तपशील सादर करण्यात आला. उर्वरित थकबाकीची निश्चित कालमर्यादेत वसुली पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्हास्तरावर नियमित पाठपुरावा करून प्रकरणांचा जलद निपटारा करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश देताना मंत्री देसाई यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
महारेरा आदेशांची प्रभावी अंमलबजावणी ही घरखरेदीदारांच्या हितसंरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत संबंधित विभागांनी तातडीने ठोस निर्णय घेऊन वसुलीचे प्रमाण वाढवावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रलंबित प्रकरणांमध्ये निष्क्रियता आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवरही आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
* संग्रहित छायाचित्र
