“‘सेल्फी’चा मोह ठरू शकतो धोकादायक; कनेक्टिंग लिंकवर वाहन थांबवू नका” – एमएसआरडीसीचे आवाहन
मुंबई, दि. ३ : यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या कनेक्टिंग लिंक अर्थात ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वाहनचालक आणि प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भव्य केबल-स्टेड पूल आणि अत्याधुनिक बोगद्यांमुळे हा मार्ग नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, या आकर्षणामुळे काही वाहनचालक द्रुतगती मार्गावर वाहने थांबवून सेल्फी, छायाचित्रे आणि व्हिडिओ काढत असल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिला आहे.
प्रकल्प सुरू झाल्यानंतर अनेक पर्यटक आणि वाहनधारक केबल-स्टेड पूल तसेच बोगद्याजवळ वाहन थांबवून छायाचित्रण करत असल्याचे आढळून आले आहे. द्रुतगती मार्गावर कोणत्याही परिस्थितीत वाहन थांबवण्यास परवानगी नसल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. अचानक थांबवलेल्या वाहनांमुळे मागून येणाऱ्या वाहनांना धडक बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः उच्च वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या मार्गात अशा प्रकारचे थांबे जीवघेणे ठरू शकतात, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
महामार्ग पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी करून कनेक्टिंग लिंक मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात आली असून बस आणि प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेग निश्चित करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्वयंचलित प्रणालीद्वारे कारवाई केली जाणार आहे.
कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन्ही बोगदे आणि पूल परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून संशयास्पद हालचाली, नियमभंग किंवा विनाकारण थांबणाऱ्या वाहनांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वाहन थांबवणाऱ्या चालकांची माहिती तात्काळ महामार्ग पोलिसांकडे पाठवली जाणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसीने नागरिकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. “सेल्फी, रिल्स किंवा छायाचित्रांसाठी द्रुतगती मार्गावर वाहन थांबवू नका. तुमच्या एका चुकीमुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो,” असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि सुखकर प्रवास करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रकल्प हा राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन आणि वेगवान प्रवास सुविधा यामुळे हा मार्ग भविष्यातील आधुनिक महामार्ग व्यवस्थेचा आदर्श ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
