मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. १२ : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी भोसले यांच्या अद्वितीय गायकीचा आणि भारतीय संगीताला दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे तसेच आमदार प्रसाद लाड यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार तसेच चाहत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
सुमधुर आवाज, विविधतेने नटलेली गायकी आणि अनेक भाषांमधील हजारो गाण्यांमुळे आशा भोसले यांनी भारतीय संगीतसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान कलावंत गमावला असून, त्यांच्या आठवणी आणि गाणी कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील.
