महसूल गुप्तचर संचालनालयाकडून तब्बल २४ जण अटकेत
मुंबई, दि. १० : महसूल गुप्तचर संचालनालयाने राबविलेल्या ‘ऑपरेशन दहाबू ब्लिट्झ’ अंतर्गत सोन्याच्या संघटित तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एक व्यापक जाळे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत सुमारे ३७.७४ कोटी रुपये किमतीचे एकूण २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले असून २४ जणांना अटक करण्यात आली आहे.
अधिकृत माहितीनुसार, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नैरोबीहून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
या कारवाईदरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांच्या गटासह एकूण २४ परदेशी नागरिकांना अडवण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २५.१० किलो सोन्याची बिस्किटे आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. हे सोने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने लपवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
तपासात पुढे असेही समोर आले की, या प्रकरणामागे संघटित आणि प्रशिक्षित वाहकांचा वापर करणारे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत होते. प्रवाशांना संशय न येईल अशा पद्धतींचा वापर करून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित जाळ्याशी निगडित इतर व्यक्ती आणि दुव्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी देखरेख अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
