पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर; १५ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजन
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ संदर्भात शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकललेली चाचणी
या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी घोषित करण्यात आला होता. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी नियोजित होती; मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता नव्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
नवी मुंबईत होणार चाचणी
सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७, कळंबोली येथे आयोजित करण्यात येणार आहे. चाचणी प्रक्रियेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, पारदर्शक आणि अचूक मूल्यांकनासाठी ही प्रणाली उपयोगात आणली जाणार आहे.
उमेदवारांना सूचना
आयोगाच्या वतीने सर्व पात्र उमेदवारांना शारीरिक तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली ही शारीरिक चाचणी सुधारित वेळापत्रकानुसार पार पडणार असून, उमेदवारांनी आवश्यक तयारीसह वेळेत हजर राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
