मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचे प्रयत्न उधळले; ६४ कोटींचा माल जप्त
मुंबई, दि. २० : मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत अंमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्रभर चाललेल्या या विशेष मोहिमेत चार संशयित प्रवाशांना अडवून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.
सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रगत प्रवासी सूचना प्रणाली आणि स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बँकॉकहून मुंबईत आलेल्या चार प्रवाशांची निवड करून त्यांना तपासासाठी थांबविण्यात आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने अधिक तपास करण्यात आला असता तस्करीचे चार वेगवेगळे प्रकार उघडकीस आले.
या कारवाईत एकूण अंदाजे ६४.३९४ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे ६४.३९४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक परदेशी नागरिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तस्करीसाठी परदेशी नागरिकांचा वापर करण्याची नवी पद्धत यामधून उघड झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
सदर प्रकरणी सर्व आरोपींना अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता आणि समन्वय यामुळे मोठा तस्करीचा साठा रोखण्यात यश आले आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये दि. १८ मार्च २०२६ पर्यंत मुंबई विमानतळावर एकूण २४४ प्रकरणांमध्ये १,३३० किलोग्रॅमपेक्षा अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणांमध्ये एकूण २८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करीविरोधात सीमा शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या कठोर कारवाईचे हे द्योतक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
