शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई/सोलापूर, दि. १९ : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा उलगडा झाला असून, हा प्रकार एका अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दि. १७ मार्च २०२६ रोजी प्रशालेतील कस्टडी कक्षात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या प्रश्नपत्रिका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परीक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असताना पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
सांगोला पोलिसांच्या तपासादरम्यान संबंधित अल्पवयीन बालकाचा शोध लागला असून, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हा करताना वापरण्यात आलेले साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरीस गेलेल्या इयत्ता १० वीच्या प्रश्नपत्रिका आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका यांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिका साठवणूक कक्षांमध्ये देखरेख वाढविणे, प्रवेश नियंत्रण अधिक मजबूत करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करणे यावर भर देण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही शालेय शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
