“राष्ट्रीय हळद मंडळ आणि भारतीय मसाला मंडळातर्फे नांदेड येथे हळद खरेदीदार” – विक्रेता बैठक आयोजित
नांदेड, दि. ८: हळदीची मूल्यसाखळी बळकट करण्यासाठी आणि निर्यातयोग्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय हळद मंडळ हे भारतीय मसाला मंडळाच्या सहकार्याने, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत, ९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथील हॉटेल विट्स येथे हळदीवरील खरेदीदार–विक्रेता बैठक आयोजित करत आहे.
देशातील हळद उत्पादनासाठी महाराष्ट्र हा महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एक असून नांदेड , हिंगोली तसेच लगतचे जिल्हे उच्च गुणवत्तेच्या हळदीच्या प्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळवत आहेत. यामध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त प्रसिद्ध वाईगाव हळद, सांगली आणि वसमत हळद या हळदीच्या जातींचा समावेश आहे.
शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, शास्त्रज्ञ तसेच धोरणनिर्माते यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे हा या खरेदीदार- विक्रेता बैठकीचा उद्देश आहे. या माध्यमातून थेट बाजारपेठेशी जोडणी सुलभ करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या गरजांनुसार गुणवत्ता नियमांचे पालन करणाऱ्या हळद उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोलीचे अध्यक्ष, आमदार हेमंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे विशेष पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला अधिक बळ देत एन. भवानी श्री, आयएएस, सचिव, राष्ट्रीय हळद मंडळ, या प्रमुख भाषण करणार असून त्या भारतातील हळद क्षेत्राच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेल्या धोरणात्मक आराखडा आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमात राज्य शासनाच्या कृषी आणि उद्योग विभागांतील वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ज्ञही सहभागी होणार असून, ते हळद उत्पादक शेतकरी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या सहाय्य यंत्रणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीदरम्यान होणाऱ्या तांत्रिक सत्रांमध्ये सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड, समन्वित कीड व्यवस्थापन, निर्यात दर्जाची मानके, कीटकनाशक अंश नियमांचे पालन, कापणीनंतरचे व्यवस्थापन तसेच हळदीसाठी उपलब्ध होत असलेल्या जागतिक बाजारपेठेतील संधी या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात प्रगतीशील शेतकऱ्यांच्या अनुभव कथन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये शेतकरी शाश्वत शेती पद्धती आणि बाजारपेठेशी जोडणी याबाबतचे आपले प्रत्यक्ष अनुभव सांगणार आहेत. या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे खरेदीदार–विक्रेता संवाद सत्र. या सत्रात निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून दर्जाची आवश्यकता, खरेदीच्या संधी, किंमत निर्धारण पद्धती आणि दीर्घकालीन पुरवठा व्यवस्था याबाबत चर्चा करणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय हळद मंडळ महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्यात मानकांनुसार हळद उत्पादनाबाबत जागरूकता वाढवणे, शेतकरी आणि उद्योग क्षेत्रातील दुवे अधिक बळकट करणे, तसेच हळदीच्या उत्पादनात मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढवणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून उच्च दर्जाच्या मसाल्यांच्या निर्यातीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रणी स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीकोनाला चालना मिळणार आहे.
हा कार्यक्रम ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे. हळद मूल्यसाखळीशी संबंधित सर्व इच्छुक घटकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन माहिती सत्रांचा आणि परस्पर संपर्काच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
