डीआरआयच्या नागपूर शाखेने दोन ठिकाणी केली कारवाई
मुंबई, दि. २८: महसूल गुप्तचर यंत्रणा संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागातील नागपूर क्षेत्रिय कार्यालयाने आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी टोळीवर कारवाई करुन १,२५१ किलो कॅनाबिज म्हणजेच गांजा जप्त केला. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवर आधारित दोन एकमेकांशी संबंधित कारवायांमध्ये विभागाने जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे ६.२५ कोटी रुपये आहे. ओडिशा – मध्य भारत अशी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
ओडिशा आंध्र प्रदेशच्या सीमेवरुन मध्य प्रदेश राजस्थानच्या सीमा भागात जाणाऱ्या एका बोलेरो जीपला डीआरआय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर थांबवले. वाहनाचा शोध घेतला असता अधिकाऱ्यांना आल्यामध्ये लपविलेल्या ७२९ किलो गांजाच्या ५३ पिशव्या मिळाल्या या पिशव्यांमध्ये गांजाची १४२ पाकिटे होती. या जप्त केलेल्या गांजाची किंमत ३.६४ कोटी रुपये आहे. या कारवाईत एनडीपीएस १९८५ कायद्यांतर्गत गांजासह वाहन जप्त करण्यात आले तसेच दोन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण टोळीचा म्होरक्या होता आणि बरीच वर्षे फरार होता.
त्याआधी डीआरआय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील भागीमहारी पथकर नाक्यावर ओडीशाच्या सीमा भागातून आलेल्या एका ट्रकला थांबवून गांजाची १०० पाकिटे जप्त केली. या गांजाचे एकूण वजन ५२२ किलो होते आणि त्याची पाकिटे कूलर्स, टेबल फॅन्स आणि ब्लँकेटसखाली लपवली होती. जप्त केलेल्या गांजाची किंमत २.६१ कोटी रुपये असून या कारवाईत वाहनदेखील जप्त करण्यात आले आणि दोन व्यक्तींना अटक करण्यात आली.
राज्यांच्या सीमा भागातून होणाऱ्या संघटीत अमली पदार्थ तस्करीविरोधात डीआरआयने लागोपाठ केलेल्या कारवाईतून डीआरआयची अमली पदार्थ विरोधातील कारवाईची नियमित अंमलबजावणी दिसून येते. नशा मुक्त भारत या केंद्र सरकारच्या अभियानातील डीआरआयचा सहभाग आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधातील लढ्याचा दृढ निर्धार या यशस्वी कारवाईमधून प्रत्ययाला येतो.


