मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ‘ जावे विनोदाच्या गावा‘ विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. २७: जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात व्यक्त केला.
कार्यक्रमास व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा उपयोग करीत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनिता पवार म्हणाल्या, लंडनमध्ये मराठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे केंद्र ठरणाऱ्या प्रस्तावित महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागील काळात पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मराठी भाषेच्या प्रचारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानही वाढवून देण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे समस्त मराठी जन आनंदित झाले आहेत. हा मराठी भाषेचा खूप मोठा गौरव आहे. मराठी भाषा ही अर्थाजनाची भाषा होण्यासाठी हा दर्जा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.
