मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त; दोन प्रवाशांना अटक
मुंबई, दि. ४: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधातील एका मोठ्या कारवाईत बँकॉकहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन महिला प्रवाशांकडून ७.९५ किलो कोकेन जप्त केले अवैध बाजारात याची अंदाजे किंमत ७९.५ कोटी रुपये आहे.
मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांना रोखून त्यांच्या सामानाची बारकाईने तपासणी केली. या तपासणीत खेळण्यांच्या पॅकेजेसमध्ये लपवून ठेवलेले पांढऱ्या पावडरीचे विटांच्या आकाराची २२ पॅकेट सापडली. एनडीपीएस फील्ड किटच्या मदतीने केलेल्या चाचणीत हे पदार्थ कोकेन असल्याचे पुष्टी झाली.
अंमली पदार्थआणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आणि दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रयत्नामागील व्यापक नेटवर्क उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालय नशा मुक्त भारत निर्माण करण्याच्या, अमली पदार्थांना अथकपणे रोखण्याच्या, आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या आणि राष्ट्राचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.


