छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर निगराणीदरम्यान झाली कारवाई
मुंबई, दि. ८: मुंबई सीमा शुल्क विभाग झोन-III च्या अधिकाऱ्यांनी, तस्करी विरोधातील आपली मोहीम सुरू ठेवत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआय) ६ एप्रिल २०२५ रोजी, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि सोने जप्त केले.
1. हायड्रोपोनिक गांजा (मातीशिवाय वनस्पती लागवड पद्धतीने पिकवलेला गांजा) जप्त – ज्याचे काळ्या बाजारातील मूल्य सुमारे ९.५३ कोटी रुपये आहे.
स्पॉट प्रोफाइलिंग या वर्तन आधारित निगराणीच्या आधारावर, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6 ई 1052 ने बँकॉकहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाला अटक केली. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात आढळलेला ९.५३२ किलो संशयास्पद हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. ज्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ९.५३ कोटी रुपये आहे. हा गांजा ट्रॉली बॅगमध्ये हुशारीने लपवण्यात आला होता. अंमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या संबंधित तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली. सध्या पुढील तपास सुरू आहे.
VLLG.jpeg)
२. तस्करी केलेले सोने जप्त – किंमत ५८.८३ लाख रुपये.
एका वेगळ्या प्रकरणात, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6 ई 1854 द्वारे दुबईहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना अटक केली. या प्रवाशांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ आढळलेले २१ कॅरेट शुद्धतेचे कच्चे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. या सोन्याचे वजन ०.७८९ किलो असून त्याची सध्याची किंमत ५८.८३ लाख रुपये आहे. प्रवाशांनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. या प्रकरणात सीमा शुल्क कायद्यानुसार आवश्यक कारवाई केली जात असून पुढील तपास सुरू आहे.

सतर्क देखरेख आणि गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखालील अंमलबजावणी कृतींद्वारे भारतात तस्करी रोखण्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी मुंबई सीमा शुल्क विभाग वचनबद्ध आहे.
