लवकरच बलात्कार प्रकरणी दोषी आसाराम बापूवर बनणार बायोपिक
सध्या बॉलिवूडला बायोपिकने वेड लावलंय. राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्यावर आधारित बायोपिक आल्यानंतर आता अजून एक बायोपिक येणार आहे. जोधपूरच्या तुरुंगात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.
पत्रकार उशीनर मजूमदार यांच्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या बायोपिकमध्येही आसाराम बापूच्या जीवनातील विविध पैलू उलगडले जाणार आहेत.
‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ हे पुस्तक वाचले आणि मला ते प्रचंड आवडले. पीसी सोलंकी यांच्या कामानं मी प्रचंड प्रभावित झालो. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेता लढवला होता आणि खटला जिंकत त्या मुलीला न्याय मिळवून दिला होता. या खटल्याशी संबंधीत जोधपूर आणि सूरत कारागृहातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही या बायोपिकसाठी मला प्रेरित केल्याचं निर्माते सुनील बोहरा यांनी सांगितलं.’
आसाराम बापूच्या या बायोपिकमध्ये आसारामची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे अजून गुलदस्त्यात आहे.
