चंद्रयान-३ यानाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा, दि. १४: भारताची दुसरी चंद्रयान मोहीम अपयशी ठरली परंतू त्यातून पुन्हा उभारी घेत भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने ISRO पुढे जाण्याचं निर्धार केला. अखेर भारताचे तिसरे चांद्रयान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. काउंटडाऊननंतर चांद्रयान-३ रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करून अवकाशात पाठवण्यात आले. त्यानंतर भारत आता जगभरात एक मोठा विक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे. जर चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग केले तर भारत हा पराक्रम करणाऱ्या जगातील निवडक देशांच्या यादीत सामील होईल.
‘चांद्रयान-३’ कार्यक्रमांतर्गत, इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट-लँडिंग’ आणि चंद्राच्या भूभागावर रोव्हर वॉकचे प्रात्यक्षिक करून नवीन सीमा तोडणार आहे. LVM3M4 रॉकेटने इस्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ ला पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्राच्या प्रवासासाठी प्रक्षेपित केले आहे. या रॉकेटला आधी GSLVMK3 असे म्हटले जात होते. जड उपकरणे वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे अंतराळवीर त्याला ‘फॅट बॉय’ असेही म्हणतात. चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपस्थित सर्व शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.
