राज ठाकरे यांनी काहीही शोधून काढलेले नाही : विनोद तावडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंनी आता २७ एप्रिलनंतरही राज्यात आपल्या सभा सुरूच ठेवाव्यात. याचे कारण म्हणजे त्यांच्या टुरिंग टॉकीजमुळे लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. तसेही ते निवडणुका लढवत नसल्याने ही स्टँडअप कॉमेडी सुरू ठेवायला काही हरकत नाही, अशा शब्दांत तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याआश्वासनांची समिक्षा व पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. राज यांनी मुंबईतील सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
आज विनोद तावडेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंच हे म्हणणं म्हणजे पवारसाहेबांच बोट धरुन पुढे येणं आहे. या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे मुकेश अंबानी ठरवत नसून, देशातील सर्वसामान्य जनता ठरवत असल्याचे तावडे यांनी म्हटले.
हा फोटो नेमका आला कुठून, या प्रश्नाचे उत्तर देताना तावडे म्हणाले की, ‘एखाद्या मोदीप्रेमीने तो सोशल मीडियावर पोस्ट केलेला असू शकतो. अशा पद्धतीने जाहिरातीत फोटो वापरल्याचे आमच्या लक्षात आले हे चिले कुटुंबातील सदस्यांनीच स्वत:हून सांगितले आहे. त्यामुळे यात राज ठाकरे यांनी काहीही शोधून काढलेले नाही, त्यांनी तसा आव आणू नये अशी टीका विनोद तावडे यांनी केली आहे.
