पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन; केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी जगावल्या जुन्या आठवणी
पुणे, दि. २९: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ७३ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून आजारपणाशी चालू असलेली झुंज आज अखेर संपली. बापट १९७३ पासून राजकारणात सक्रिय होते. १९८३ ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते. आज संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या वैकूंठ भूमी स्मशानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गिरीश बापट यांनी महाराष्ट्राच्या तसंच पुण्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं असून त्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रिय मंत्री व भाजप नेते नितिन गडकरी यांनी गिरीश बापट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणाले की, “गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील.” पुढे जुन्या आठवणी जागवत गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे.”
