निवडणूक आयोगाने शिवसेनेचा निकाल लावला; पक्षाचं नाव व चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय
मुंबई, दि. १७: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव व धनुष्य बाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना हे नावं तसंच ढाल तलवार हे पक्ष चिन्हं गोठवलं आहे. सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी या निकालात आयोगानं पक्षांतर्गत लोकशाही संदर्भातही अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत. अनेक वेळा पक्षाचे प्रमुख नेते पक्षांतर्गत निवडणुका न घेता अध्यक्षपद पटकावतात.
त्यांच्याच मर्जीतल्या लोकांची पक्षातल्या प्रमुख पदांवर नेमणूक करतात. त्यामुळं पक्षांतर्गत लोकशाहीच्या तत्त्वाला आळा बसतो, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय पक्षांनी अंतर्गत लोकशाहीचं अधिकाधिक पालन करावं, पक्ष संघटनेची माहिती, पक्षाची घटना यासारख्या गोष्टी पक्षाच्या वेबसाइटवर टाकाव्यात असं आयोगाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.
