भाजप आणि कॉंग्रेस ला धोबीपछाड देत नोंदवला मोठा विजय
नवी दिल्ली, दि. ७: दिल्ली महानगरपालिका (एमसीडी MCD) निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) मोठा विजय मिळवला आहे. निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. ज्यामध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार करत १३४ जागा जिंकल्या. तर भाजपने १०४ जागा जिंकल्या आहेत. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. सकाळी ९ वाजताच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप ६६ जागांवर तर आप ३० जागांवर आघाडीवर होता. काही काळानंतर आप आणि भाजपमध्ये निकराची लढत झाली, पण नंतर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकूण २५० जागांपैकी ‘आप’ने १३४ जागा जिंकल्या, भाजपने १०४ जागा जिंकल्या आणि कॉंग्रेसने ९ जागा जिंकल्या. तीन अपक्षही निवडून आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ३ नंतर सर्व जागांची मतमोजणी संपल्याची घोषणा केली. दिल्ली महानगरपालिकेसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. ‘आप’ ला ४२.०५% मते मिळाली तर भाजपला ३९.०९% आणि कॉंग्रेसला ११.६८% मते मिळाली. भाजपच्या १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले तर आम आदमी पार्टीच्या ३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या १८८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
