अवघ्या दीड महिन्यापूर्वी झाली होती निवड
ब्रिटनच्या प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी अवघ्या दीड महिन्यात राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून निवडणूक लढवताना दिलेली आश्वासन पाळण्यात अपयश आल्यानं, पक्षाचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला आहे. त्यामुळं हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी आज सांगितलं. त्यांचा उत्तराधिकारी निवडीसाठीची पक्षांतर्गत प्रक्रीया आठवडाभरात पूर्ण होईल.
कर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर पौंड आणि ब्रिटनच्या कर्ज रोख्यांच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर ट्रस यांना अर्थमंत्री क्वासी क्वारटेंग यांना पदावरुन दूर करावं लागलं होतं. यानंतर त्यांनी पुन्हा कर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांनी कालच त्यांच्यावर टीका करत राजीनामा दिला होता.
केवळ ४५ दिवस ट्रस ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी होत्या. एवढ्या कमी कालावधीसाठी कुणीही ब्रिटनचं प्रधानमंत्रीपद भूषवलेलं नाही. १८२७ मध्ये जॉर्ज कनिंग यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अवघ्या ११९ दिवसात त्यांचा मृत्यू झाला होता.
