विविध जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार ७६ टक्के मतदान
मुंबई, दि. १८ : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ६६.१० टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. १९ सप्टेंबर) होईल.
