‘जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिन’ उरण पिरवाडी समुद्रकिनारी संपन्न
उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे) : १७ सप्टेंबर हा सर्वत्र जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून सागरी सीमा मंच, पर्यावरण गतिविधी या पर्यावरणवादी, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

उरण मधील पिरवाडी समुद्रकिनारी प्लास्टीक बाटल्या, केर-कचरा, दारूच्या बाटल्या, प्लास्टीकच्या पिशव्या तसेच समुद्रातून वाहून आलेला केर-कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमे अंतर्गत एकूण ५०० किलो कचरा गोळा करण्यात आला. उरण व खारघर येथील एकूण १६० स्वयंसेवकांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अथक परिश्रम घेऊन उरण पिरवाड़ी समुद्रकिनारा स्वच्छ केला. शेवटी सर्वाना नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण-संवर्धन व्हावे, पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी, सागरी किनारे स्वच्छ-सुंदर व्हावेत हा स्वच्छता अभियान राबविण्या मागचा हेतू असल्याचा सागरी सीमा मंचचे सदस्य श्रीपाद कातरणे यांनी सांगितले. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे कामी नागाव ग्रामपंचायतीचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन गायकवाड, ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, सागरी सीमा मंच, पर्यावरण संरक्षण गतिविधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, NSS यूनिट, उरण कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड आर्ट्स, उरण व्यापारी असोसिएशन, मी उरणकर ट्रस्ट, लायन्स क्लब उरण, ग्रामपंचायत नागाव, उरण नगर परिषद, लोहाना समाज उरण, यूईएस कॉलेजचे विद्यार्थी तसेच इतर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

