राज्यात दिवसभर पावसाचा हाहाकार !
मुंबई, दि. १६ : राज्याच्या विविध भागात कालपासून जोरदार पाऊस होत आहे. राजधानी मुंबईत पूर्व उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस होता. सकाळपासून अधून-मधून जोरदार सरी येत आहेत. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काहिसा परिणाम झाला. मुंबईला पाणी पुरवणारे सातही तलाव भरले असून, एकूण ९९ पूर्णांक ३२ शतांश टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ९५ टक्के भरल्यानं पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. आज सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून ६ हजार ७४१ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. दारणा धरणातून १० हजार ५६२, नांदूरमध्य मेश्वरमधून ३६ हजार ६३१ तसेच पालखेड मधून ५ हजार ९६४ तर कडवा मधून ५ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना धरण क्षेत्रात पाऊस वाढला असून, आज दहा वाजता सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. धोम धरणातूनही विसर्ग होत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून धरणाचे १८ दरवाजे आता अडीच फुटावरुन तीन फुटावर स्थिर करण्यात आले आहेत. धरणाच्या सांडव्याद्वारे आता ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
