स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सोहळा राज्यभर उत्साहात साजरा
मुंबई, दि. १५ : देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिन आज राज्यातही सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमीत्तानं सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रमांचंही आयोजन केलं गेलं आहे. येत्या काळात राज्याला उन्नतीच्या मार्गाकडे नेण्यासोबतच, विदर्भात अधिकाधिक गुंतवणूक आणत इथल्या विकासाला गती देण्याचा मनोदय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजारोहणानंतर व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.
रायगडमध्ये पोलीस कवायत मैदानावर झालेल्या जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सोहळ्यात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिसांचा सत्कारही केला. पूर्ण क्षमतेनं राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देऊ असा मनोदय दादाजी भुसे यांनी धुळ्यात ध्वजारोहणानंतर व्यक्त केला. नंदूरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी कोरोना काळात दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल रुग्णालयांचा गौरव केला गेला. नांदेडमध्ये झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. वाशीममध्ये जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या मुख्य सोहळ्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी स्वातंत्र्य लढ्यातल्या जिल्ह्यातल्या २१ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली गेली. जालना जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या जिल्ह्याच्या मुख्य सोहळ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
नवी मुंबईत कोकण भवनात कोकण विभागीय अप्पर आयुक्त किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. रत्नागिरीत झालेल्या जिल्ह्याच्या मुख्य सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं.
सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला गेला. चंद्रपूर जिल्ह्यात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते, यवतमाळमध्ये अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते, बीडमध्ये जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, गडचिरोलीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते, गोंदियात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते, बुलडाण्यात जिल्हाधिकारी रामामुर्ती यांच्या हस्ते तर, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सोहळ्यात विभागीय आयुक्त पांढरपट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अकोल्यात भर पावसातच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ध्वजारोहणाचा सोहळा झाला, यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भंडाऱ्यात पोलीस कवायत मैदानात झालेल्या सोहळ्यात जिल्हाधिकारी संदीप कदम हस्ते ध्वजारोहण झालं.