शिवसेनेशी पंगा महागात, किरीट सोमय्यांचा पत्ता कट..’हे’ आहेत भाजपचे उमेदवार
मुंबई: ईशान्य मुंबईतून भाजपकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे ईशान्य मुंबईतील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेशी घेतलेला पंगा चांगलाच महागात पडला आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने आगामी लोकसभेसाठी सोमय्यांचे तिकीट कापले आहे.
किरीट सोमैयांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मधल्या काळात त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. तसेच मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबतही त्यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आज भाजपला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवणे जास्त महत्वाचे आहे त्यामुळे शिवसेनेला दुखावणे हे परवडण्याजोगे नव्हते. ही जागा जर किरीट सोमैय्यांनी लढवली असती तर निश्चित शिवसैनिकांनी त्यांना दणका दिला असता आणि भाजपला एका हक्काच्या जागेला मुकावं लागलं असतं.
