विधान परिषद निवडणुकीत २८५ सदस्यांनी केले मतदान
मुंबई, दि. २० : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी ४.०० वाजेपर्यंत एकूण २८५ सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, आणि प्रसाद लाड, तर शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, असे एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतं मिळवण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीत फाटाफूट होणार नाही, असा विश्वास, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता.
शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल ठाकरे यांनी शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं, गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. फाटाफुटीचं राजकारण आपण बघत आलो, तरीही शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूतीनं उभी राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. भाजपाच्या सर्व आमदारांना मतदान करण्यापूर्वी पसंतीक्रम कसा द्यायचा याची माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतू, तेथेही ती त्यांच्या पदरात निराशाच पडली. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुख आणि मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळली होती.
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी थेट रुग्णालयातून विधानभवन गाठलं. आजारी असल्यामुळे त्या पुण्याच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्या रुग्णवाहिकेनं विधानभवनात मतदान करण्यासाठी पोचल्या होत्या.
