गुजरात कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
गांधीनगर: काँग्रेसचे गुजरातमधले नेते हार्दिक पटेल यांनी आज गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. गांधीनगर इथं कमलम् या भाजपा मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. आणखी एक काँग्रेस नेत्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनीही याच कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. तीन वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर गेल्या महिन्यातच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेलांनी ट्विट केले आहे. देश आणि राज्याच्या हिताचे काम आपण करणार असून, एका नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘छोटा शिपाई’ बनून काम करणार असल्याचेही पटेल म्हणाले.
