केंद्रातील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण
राजकारण, दि.३०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण होत आहेत. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दुसऱ्यांदा मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. या आठ वर्षात नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. जीवनमान सुलभतेवर सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं असून सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांचं जीवन सुकर होत असल्याचा दावा केला जात आहे.
मोदी सरकारकडून आणखी अनेक दावे केले जात आहेत. त्यातले वाढत्या आकांक्षा आणि जीवनमान सुलभता यांचा मेळ घालत आज नवभारताची व्याख्या लिहिली जात आहे. अद्ययावत पायाभूत सुविधांद्वारे जगणं सुखकर होत आहे. २००२ ते २०१४ या काळात मेट्रोचं काम वर्षाला २० किलोमीटर होतं, तेच २०१४ ते २०२० या कालावधीत वर्षाला ६३ किलोमीटरवर पोहोचलं आहे. डिजिटल पेमेंट मुळे जीवन सुकर होत असून भीमसारख्या ऍपमुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत ११८ लाख कुटुंबांना नळाची जोडणी मिळाली आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनारोग्य योजना यासारख्या योजनाअंतर्गत ३ कोटी २६ लाख नागरिकांवर मोफत उपचार शक्य झाले. ८ हजार ७०० जनौषधी केंद्रांमधून परवडणाऱ्या दरात औषधं मिळणं शक्य झालं असून नागरिकांची ५० ते ९० टक्के बचत होत आहे. पहल योजनेमुळे एलपीजी जोडणीतील दलालीला पायबंद बसला. या योजनेचे २९ कोटींहून अधिक लाभार्थी असून ७० हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची बचत होत आहे.
